मॉस्को: रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम जगभर पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड सुरू आहे. कोरोना संकटातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पुतीन यांनी सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम युक्रेनमध्ये ठळकपणे दिसत आहेत. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. पुतीन यांच्या मनात नेमकं काय चाललंय, रशियाची कारवाई कुठपर्यंत सुरू राहणार, असे प्रश्न जगाला पडले आहेत.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे फोटो, व्हिडीओ सातत्यानं समोर येत आहेत. त्यातच आता रशियन रणगाड्याच्या एका फोटोमुळे जगाची चिंता वाढली आहे. फोटोत दिसणाऱ्या रणगाड्यावर सोव्हिएत युनियनचा झेंडा आहे. सोव्हिएत युनियनची ३० वर्षांपूर्वी शकलं झाली. त्यातून रशियासह १५ देशांचा जन्म झाला. याच देशांना जोडण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रयत्नशील आहेत.
सोव्हिएत युनियनच्या विघटनाचा इतिहास बदलण्याचा मानस पुतीन यांनी अनेकदा बोलून दाखवला आहे. २००८ मध्ये रशियानं जॉर्जियामध्ये सैन्य कारवाई केली. जॉर्जियाचे काही भूभाग रशियानं गिळंकृत केले. त्यानंतर २०१४ मध्ये युक्रेनचा भाग असलेला क्रिमिया द्विपकल्प रशियानं बळकावला. काही दिवसांपूर्वीच रशियानं युक्रेनच्या दोन भागांना स्वतंत्र देशांचा दर्जा दिला. यानंतर रशियानं युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. त्यामुळे पुतीन यांची वाटचाल सोव्हिएत युनियनच्या निर्मितीच्या दिशेनं सुरू असल्याचं बोललं जात आहे. युक्रेनच्या अध्यक्षांचा मोदींना फोन युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांचे प्रयत्न सुरू असताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. मोदी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी ट्विट करून दिली आहे. 'पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे १ लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर असून ते नागरी वस्त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती त्यांना दिली. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. आक्रमकांना एकत्र येऊन रोखुया,' असं झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.