वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दीड आठवडा उलटला आहे. मात्र अद्याप तरी युद्धाला पूर्णविराम लागेल, अशा कोणत्याही घडामोडी घडताना दिसत नाही. युक्रेनला लष्करी मदत पुरवू, मात्र रशियाविरोधात सैन्य उतरवणार नसल्याचं म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन सरकारला एक अजब सल्ला दिला आहे.
अमेरिकेच्या एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी झेंडा लावून रशियावर बॉम्ब टाकावा, असं ट्रम्प म्हणाले. त्यांच्या विधानाची अमेरिकेत चर्चा होत आहे. मी देशाचा अध्यक्ष असतो, तर रशियानं युक्रेनवर हल्लाच केला नसता, असं विधान ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि नाटो मूर्खासारखे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अतिशय हुशार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते.
अमेरिकेनं एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत. त्यानंतर हा हल्ला चीननं केल्याचं सांगावं. मग ते आपापसात लढू लागतील आणि आपण बसून बघत राहू, असं ट्रम्प यांनी रिपब्लिकन समितीसमोर म्हणाले होते. पक्षाचे देणगीदार यावेळी उपस्थित होते. ट्रम्प यांनी बैठकीत केलेला विनोद ऐकून सगळेच हसू लागले.
नाटो म्हणजे कागदी वाघ असल्याची टीका ट्रम्प यांनी केली. यावेळी ट्रम्प जो बायडन यांच्यावरही बरसले. रशिया अणुशक्ती असल्यानं आम्ही त्यांच्यावर कधीही हल्ला करू शकत नाही, अशी विधानं करणं बायडन यांनी बंद करावं, असं ट्रम्प म्हणाले.