Russia vs Ukraine War: पुतीन यांना मोठा धक्का! युक्रेन युद्धात 'ते' ३९ जण धारातीर्थी; प्रतिष्ठा धुळीस मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:57 PM2022-04-04T13:57:00+5:302022-04-04T13:57:23+5:30
Russia vs Ukraine War: पुतीन यांच्या चुकलेल्या निर्णयांची किंमत 'त्या' ३९ जणांना चुकवावी लागली
मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून दीड महिना होत आला आहे. अद्याप युद्ध पूर्णपणे संपलेलं नाही. मात्र रशियन फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. बलाढ्य रशियन लष्करासमोर युक्रेनचा फार दिवस निभाव लागणार नाही असा अनेकांचा अंदाज होता. मात्र युक्रेनच्या सैनिकांनी कडवी झुंज दिली. या युद्धात रशियन फौजांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. युद्ध लांबल्याचा परिणाम रशियन सैनिकांच्या मनोधैर्यावर झाला.
रशियन सैन्यातील प्रतिष्ठीत तुकडीची युद्धात मोठी हानी झाली. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात तुकडीनं प्रचंड नुकसान झालं. ३३१ वी पॅराशूट रेजिमेंट रशियन सैन्यातील सर्वात घातक तुकडी आहे. तुकडीला उत्तम प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. २०१४ मध्ये डोनबासमध्ये या तुकडीनं पराक्रम गाजवला होता. मात्र युक्रेनमध्ये या तुकडीचं मोठं नुकसान झालं.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अनेक अंदाज युक्रेनमध्ये चुकले. रशियन सैन्याचे बरेचसे डावपेच उधळले गेले. त्याचा फटका ३३१ व्या पॅराशूट रेजिमेंटला बसला. रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सर्गेई सुखारेव १३ मार्चला मारले गेले. त्यामुळे रेजिमेंटवर मोठा आघात झाला. मेजर सर्गेई क्रायलोव यांचाही मृत्यू झाला. याशिवाय तुकडीचे आणखी ३७ सदस्य युक्रेनमध्ये धारातिर्थी पडल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे.
पॅराशूट रेजिमेंटनं बेलारुसमधून युक्रेनमध्ये शिरकाव केला होता. रशियाच्या हवाई दलाच्या नेतृत्त्वाखाली ही रेजिमेंट युक्रेनमध्ये पोहोचली. राजधानी कीव्हवर ताबा मिळवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र युक्रेनी सैन्यानं कडवा प्रतिकार केला आणि रेजिमेंटचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे युद्ध लांबलं. रसद पुरवठा कमी होत गेला आणि त्यामुळे रेजिमेंटच्या मनोधैर्यावर परिणाम झाला.