मॉस्को: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
पाश्चिमात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियननं रविवारी याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमानं, रशियात नोंद झालेली विमानं आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानंही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.
युरोपियन युनियनचा भाग असलेले २७ देश आणि कॅनडामधून रशियाची विमानं जाऊ शकणार नाहीत. युरोपियन युनियनमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटविया, लिथुआनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन आणि स्वीडनचा समावेश होतो.