कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्यावरून भारताला धमकविणाऱ्या अमेरिकेला जोरदार धक्का बसला आहे. पुतीन यांनी युरोपीय देशांना कच्चे तेल आणि गॅस हवा असेल तर रुबलमध्ये व्यवहार करावे लागतील, असा सज्जड दम भरला होता. यावर आता युरोपचा पहिला देश तयार झाला आहे.
युरोप रशियाच्या गॅस आणि इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. यामुळे काही दिवस वाट पाहून अखेर हंगेरीने रुबलमध्ये व्यवहार करण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारताला रशियाशी मैत्री वाढविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. हंगेरी फुटल्याने युरोपीय देशांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या साथीने आघाडी उघडण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की जर रशियाने त्यांना रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले तर तसे केले जाईल. अमेरिकेच्या निर्बंधांना सडेतोड उत्तर देण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रुबलची खेळी केली होती. ती आता काम करू लागली आहे. युरोपियन कमिशनने म्हटले आहे की ज्या देशांनी युरो किंवा डॉलरमध्ये पैसे देण्याचे मान्य केले आहे, त्यांनी त्यांच्या करारावर ठाम राहावे.
हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सिझलर्टो यांनी यापूर्वी सांगितले होते की, रशियाकडून गॅस पुरवठा घेण्यात युरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांची कोणतीही भूमिका नाही. ते म्हणाले की हा द्विपक्षीय गॅस करार आहे जो हंगेरियन कंपनीचा रशियाच्या गॅझप्रॅम कंपनीशी झालेला आहे. यामुळे याच्याशी युरोपीय संघटनेचा काहीही संबंध येत नाही. रविवारी झालेल्या निवडणुकीत व्हिक्टर यांनी सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली आहे. त्यांनी वचन दिले की हंगेरियन लोकांना गॅस पुरवठा सुरु राहील.