Russia vs Ukraine War: रशियाला युद्ध महागात पडणार? 'या' ५ तटस्थ देशांनी दंड थोपटले; युक्रेनच्या मदतीला उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 06:03 PM2022-03-01T18:03:56+5:302022-03-01T18:04:17+5:30
Russia vs Ukraine War: युद्धखोर रशियाला धडा शिकवण्यासाठी ५ देश पुढे सरसावले; युक्रेनसाठी भरीव मदत जाहीर
मॉस्को: युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेता आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला युरोपियन युनियनमधील अनेक देश युक्रेनच्या मदतीला धावले आहेत. विशेष म्हणजे कोणाच्याही अध्यातमध्यात नसणारे शांत देश रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत.
स्वीडन: पंतप्रधान मॅगडेलेने एँडरसन यांनी युक्रेनसाठी लष्करी मदतीची घोषणा केली आहे. दुसऱ्या देशांना सैनिकी मदत करायची नाही हे स्वीडनचं धोरण आहे. पण युक्रेनसाठी धोरण मोडण्यात आलं आहे. स्वीडन युक्रेनला ५ हजार अँटी टँक अण्वस्त्रं, ५ हजार हेल्मेट्स, ५ हजार बॉडी आर्मर पाठवणार आहे.
स्वित्झर्लंड- आतापर्यंत तटस्थ असलेल्या स्वित्झर्लंडनंदेखील रशिया आणि पुतीन यांचा निषेध केला आहे. स्वित्झर्लंड युरोपियन युनियनचा सदस्य नाही. पण युनियनकडून लागू करण्यात आलेले सगळे निर्बंध स्वित्झर्लंडदेखील लागू करणार आहे.
फिनलँड- पंतप्रधान सना मरिन यांनी युक्रेनला शस्त्रं पुरवण्याची घोषणा केली आहे. फिनलँडकडून युक्रेनला २५०० असॉल्ट रायफल्स, १.५० लाख बुलेट्स, १५०० अँटी टँक शस्त्रास्त्रं आणि ७० हजार अन्नाची पाकिटं पाठवली जाणार आहेत.
जपान- रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचं समर्थन केलं आहे. रशियन नागरिकांची संपत्ती जप्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जपाननं युक्रेनला १०० मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. तर १०० मिलियन डॉलर इतकी रक्कम मानवीय सहायता म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
जर्मनी- दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीनं आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला आहे. युक्रेनला मदत करण्याची घोषणा झाली आहे. जर्मनी ५०० स्टिंगर मिसाईल युक्रेनला देणार आहे. संरक्षणावर ११३ अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्णयही जर्मनीनं घेतला आहे.