बर्लिन: बलाढ्य रशियाचा सामना करणाऱ्या युक्रेनची तीन दिवसांत मोठी वाताहत झाली आहे. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियाचा निषेध करत आर्थिक निर्बंध जाहीर केले. मात्र त्यामुळे रशियाला कोणताही फरक पडलेला नाही. दुसरीकडे कोणत्याच देशानं लष्करी मदत न पाठवल्यानं युक्रेन एकाकी पडला आहे. मात्र आता जर्मनीनं युक्रेनसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
वादगस्त भागातील देशांना शस्त्रांची निर्यात करायची नाही अशी जर्मनीची भूमिका आहे. पण युक्रेनला मदत करण्यासाठी जर्मनीनं आपली भूमिका बदलली आहे. जर्मनीनं युक्रेनसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. जर्मनी युक्रेनला १००० रणगाडाविरोधी शस्त्रास्त्रं आणि ५०० स्टिंगर क्षेपणास्त्र देणार आहे. स्टिंगर क्षेपणास्त्रांच्या मदतीनं जमिनीवरून हवेत मारा करता येतो.
अमेरिकेकडूनही भरीव मदतरशियाला गेले महिनाभर आव्हान देणाऱ्या अमेरिकेनं हल्ला झाल्यानंतर युक्रेनच्या मदतीला जाण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिकेची पुरती नाचक्की झाली होती. रशियाने कोणी मध्ये आल्यास इतिहास बदलून ठेवण्याचा इशारा दिला होता. यामुळे युद्धात उडी घ्यावी तरी पंचाईत नाही नाही घ्यावी तरी पंचाईत अशी अवस्था अमेरिका व नाटोची झाली होती. त्यातच आज अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता. यावर त्यांनी आम्हाला शस्त्रास्त्रे द्या अशी मागणी केली होती. यावर आता अमेरिकेने मोठी मदत देऊ केली आहे.
अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी मोठी मदत केली आहे. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेनच्या दिशेने रवाना झाला आहे. अशातच युक्रेनला रशियासोबत लढण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रांची तसेच दारुगोळ्याची गरज भासणार आहे. त्यातच युक्रेनचे प्रचंड नुकसान रशियाने केले आहे. यामुळे ही शस्त्रे विकत घेण्यासाठी युक्रेनला अमेरिकेने ३५० दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ केली आहे.