कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले सुरू आहेत. मात्र युक्रेन हार मानायला तयार नाही. बलाढ्य रशियन फौजांसमोर युक्रेनी सैनिक जीवाची बाजी लावून लढत आहेत. त्यातच आता रशियन सैनिकांच्या क्रूर कारनाम्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
रशियन रणगाड्यानं एका युक्रेनी नागरिकाची कार उडवली आहे. या कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनमधील वृत्तसंस्थेनं टेलिग्रामवर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. मोकळ्या रस्त्यावर चालणारी कार अचानक थांबल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर समोर येत असलेला रणगाडा कारच्या दिशेनं मारा करतो. रणगाड्यातून झालेल्या हल्ल्यात कारचं प्रचंड नुकसान होतं. कारचे तुकडे रस्त्यावर पसरतात.
समोरून रणगाडा येत असल्याचं पाहून कार चालकानं कार थांबवली. त्यानंतर रणगाड्यातून कारवर हल्ला झाला. या हल्ल्यात कारचा पुढील भाग पूर्णपणे नष्ट झाला. युक्रेनची राजधानी कीव्हच्या बाहेर असलेल्या मकारिवमध्ये हा प्रकार घडला.
रशियानं युक्रेनवर २४ फेब्रुवारीला हल्ला केला. रशियन रणगाड्यानं कार उडवल्याची घटना २८ फेब्रुवारीला घडली. या हल्ल्यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे ४०० नागरिक मारले गेले आहेत. तर ८०० जण जखमी झाले आहेत.