कीव्ह: गेल्या दीड महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियन सैन्य माघार घेत नसल्यानं युद्ध थांबण्याची शक्यता नाही. युक्रेनचं सैन्य बलाढ्य रशियाशी दोन हात करत आहे. त्यातच या युद्धात घडलेला चकमकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. युक्रेनची राजधानी कीव्हपासून ५० मैलांवर युक्रेनच्या एका रणगाड्यानं रशियन लष्कराच्या एका संपूर्ण तुकडीला नाकीनऊ आणले.
युक्रेनच्या रणगाड्यानं रशियाच्या संपूर्ण तुकडीला एकहाती लढत दिली. ड्रोननं हा संघर्ष कॅमेऱ्यात टिपला आहे. युक्रेनच्या T-64 रणगाड्यानं उत्तम पोझिशन घेतली होती. या रणगाड्यानं रशियाच्या BTR-82A या शस्त्रसज्ज वाहनांवर हल्ले सुरू केले. कीव्हच्या पश्चिमेला असणाऱ्या नोवा बसान येथील रस्त्यांवर हा संघर्ष सुरू होता.
युक्रेनच्या रणगाड्याची पोझिशन उत्तम होती. त्याचा फायदा रणगाडा चालवणाऱ्या व्यक्तीनं घेतला. रशियाच्या तुकडीवर त्यानं हल्ला चढवला. रशियाच्या एका BTR वाहनानं पेट घेतला. त्यानंतर रशियन लष्कराच्या तुकडीतील इतर वाहनांनी हल्ला होत असलेल्या ठिकाणाच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. मात्र युक्रेनचा रणगाडा एका घरामागे होता. त्यामुळे रशियन सैनिकांना युक्रेनच्या रणगाड्याचा वेध घेता आला नाही.
रशियन सैनिकांचे नेम चुकत असताना युक्रेनच्या रणगाड्यातून जबरदस्त मारा सुरू होता. त्याची तीव्रता इतकी होती की रशियन तुकडीला तिथून अक्षरश: पळ काढावा लागला. युक्रेन लष्कराची मदत येईपर्यंत एका रणगाड्यानं रशियन सैनिकांना दमवलं. यानंतर थोड्याच वेळात युक्रेनचे सैनिक तिथे शस्त्रास्त्रांसह दाखल झाले. त्यांनी पळणाऱ्या रशियन सैनिकांवर हल्लाबोल केला. रशियन सैनिक टाकून पळलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनं युक्रेनच्या सैनिकांनी त्यांच्यावरच निशाणा साधला.