Russia vs Ukraine War: रशियाच्या युक्रेनवरील मतदानास भारतासह १३ देश अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:33 AM2022-03-25T06:33:02+5:302022-03-25T06:33:34+5:30
ठरावाला दस्तुरखुद्द रशिया व चीन अशा दोघांचाच पाठिंबा
संयुक्त राष्ट्रे : युद्ध लादणाऱ्या रशियाने युक्रेनमधील नागरिकांच्या बिकट स्थितीबद्दल चिंता वाटत असल्याचा खोटा आव आणत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सादर केलेल्या ठरावावरील मतदानाला भारतासह १३ देश गैरहजर राहिले. या ठरावाला दस्तुरखुद्द रशिया व चीन अशा दोघांचाच पाठिंबा मिळाला.
१५ देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने सादर केलेल्या ठरावात म्हटले होते की, युक्रेनमध्ये असंख्य नागरिकांना अन्नपाणी यांची टंचाई जाणवत आहे. त्या देशातील मुले, महिला या सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शस्त्रसंधी होण्यासाठी संबंधित देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, तसेच युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. मात्र, या ठरावात युक्रेन युद्ध रशियानेच सुरू केल्याचा अजिबात उल्लेख नव्हता. या ठरावावरील मतदानप्रसंगी भारताने तटस्थ भूमिका घेतली होती.
याआधीही सुरक्षा परिषदेत युक्रेनबाबतच्या दोन ठरावांवरील मतदानालाही भारत अनुपस्थित राहिला होता. युक्रेन युद्धाची समस्या रशियाने निर्माण केली. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी रशिया आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करीत आहे, अशी टीका अमेरिकेने केली आहे.
नाटो देशांनी मदत करावी -जेलेन्स्की
कीव्ह : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले आहेत. अशा क्षणी जगभरातील लोकांनी आपापल्या देशातील चौकाचौकात, रस्त्यावर जमून युक्रेनला पाठिंबा दर्शवावा. तसेच नाटो देशांनी युक्रेनला अधिकाधिक मदत द्यावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, जगात शांतता, स्वातंत्र्य, स्थैर्य तसेच युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्व जपणेही आवश्यक आहे. ते लक्षात घेता जगभरातील नागरिकांनी युक्रेनला भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे. गेला महिनाभराच्या युद्धात शत्रूने आम्हाला नष्ट करण्याचे प्रयत्न केले. पण ते फोल ठरले, अशी जेलेन्स्की यांनी रशियाचे नाव न घेता टीका केली.