रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. बॉम्बवर्षावानं अनेक शहरं हादरली आहेत. युक्रेननं रशियाची ६ विमानं पाडली आहेत. रशियाचे ५० सैनिक ठार झाले आहेत. तर युक्रेनचे ४० सैनिक मारले गेल्याचा दावा रशियानं केला आहे. युक्रेनचं लष्करी विमान क्यिवजवळ कोसळलं आहे. यात १४ जण होते. रशियाचं सैन्य सामर्थ्य पाहता त्यासमोर युक्रेनचा निभाव लागणं अवघड आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे.
रशियाच्या लष्करी सामर्थ्यावर युक्रेन फार दिवस तग धरू शकत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्या मदतीला लष्कर पाठवणार का, अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये उतरणार का, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नाला तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर नकारार्थी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर आर्थिक निर्बध लादले आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी युक्रेनला लष्करी मदत पुरवण्याची घोषणा केलेली नाही.
बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि आता जो बायडन या अमेरिकेच्या अध्यक्षांना रशियाविरोधात कारवाई करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांनी रशियावर केवळ आर्थिक निर्बंध लादले. अमेरिकेचे अध्यक्ष बायडन रशियाविरोधात आणखी निर्बंध लादू शकतात, असा अंदाज संरक्षण विषयातील तज्ज्ञ निवृत्त मेजर जनरल बी. शंकर दयाळ यांनी वर्तवला. बायडन युक्रेनच्या मदतीला लष्कर पाठवणार नाहीत. ते अमेरिकेचं आर्थिक आणि मानव संसाधनांचं नुकसान होऊ देणार नाहीत, असं दयाळ म्हणाले.
रशिया महाशक्ती असल्यानं अमेरिका आणि पाश्चिमात्य देश युक्रेनच्या मदतीला सैन्य पाठवणार नाहीत, असं निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णींनी सांगितलं. रशियानं युद्धासाठी २ लाख सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे रशिया आक्रमक पवित्र्यात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अमेरिका युक्रेनच्या मदतीला सैन्य पाठवण्याची जोखीम पत्करणार नाही, असं कुलकर्णी म्हणाले.