Russia vs Ukraine War: रोमानियाचे महापौर भडकले, ज्योतिरादित्य शिंदेंनीही सुनावले; विद्यार्थ्यांसमोरच झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:34 PM2022-03-03T15:34:42+5:302022-03-03T15:39:18+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंची स्थानिक महापौरांसोबत शाब्दिक बाचाबाची
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियाला गेले आहेत. युक्रेनमधून रोमानियात आलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. रोमानियात विद्यार्थ्यांच्या कॅम्पमध्ये गेलेल्या शिंदे यांचा स्थानिक महापौरांशी वाद झाला. यावरून काँग्रेसनं शिंदेंवर निशाणा साधला आहे. ज्योतिरादित्य यांनी मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिंदे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावरून काही जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत काहींनी शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. शिंदे विद्यार्थ्यांना सूचना देत असताना रोमानियातील महापौरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गेलेल्या
— Lokmat (@lokmat) March 3, 2022
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची रोमानियाच्या महापौरांसोबत शाब्दिक बाचाबाची https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/pGQMWRU6eD
सरकारनं विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सोयींची माहिती शिंदे देत होते. तितक्यात स्थानिक महापौरांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ही माहिती निघताना देऊ शकता, असं महापौरांनी शिंदेंना सांगितलं. त्यावर मला काय बोलायचंय, ते मला ठरवू द्या, असं उत्तर शिंदेंनी दिलं. आम्ही विद्यार्थ्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, असं प्रत्युत्तर महापौरांनी दिलं आणि ते तिथून निघून गेले.
यानंतर शिदे यांनी विद्यार्थ्यांना सरकारनं आखलेल्या योजनेची माहिती दिली. त्यांनी रोमानिया प्रशासनाचे आभार मानले. शिंदे यांच्या व्हिडीओवरून काँग्रेस नेते सलमान निझामी यांनी निशाणा साधला आहे. 'जुमला भारतातच कामी येतो. परदेशात नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांची रोमिनायातील महापौरांनी कशी शाळा घेतली पाहा,' अशा शब्दांत निझामी यांनी शिंदे यांना टोला लगावला आहे.