Russia vs Ukraine War: ...तोपर्यंत युक्रेनविरुद्ध युद्ध सुरूच राहणार; पुतीन यांनी लक्ष्य सांगितलं, ३ अटीही ठेवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 10:53 PM2022-03-03T22:53:25+5:302022-03-03T22:57:26+5:30
Russia vs Ukraine War: पुतीन यांनी स्पष्ट शब्दांत इरादे सांगितले; युक्रेनचं टेन्शन वाढणार
मॉस्को: रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्याप तरी रशियाला राजधानी कीव्ह ताब्यात घेता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी संवाद साधला. तब्बल दीड तास दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रशियाच्या अध्यक्षांनी आपलं ध्येय मॅक्रॉन यांना सांगितलं. युक्रेनची स्थिती आणखी बिकट होणार असल्याचं पुतीन यांनी साधलेल्या संवादावरून दिसत आहे.
युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. आठवडा उलटला आहे. पण आणखी वाईट दिवस यायचे आहेत, असं मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर सांगितलं. 'युक्रेननं रशियाच्या अटी स्वीकारल्या नाहीत, तर आम्ही अधिक आक्रमक पवित्रा घेऊ. संपूर्ण युक्रेनवर नियंत्रण मिळवणं आमचं लक्ष्य आहे,' असं पुतीन यांनी म्हटल्याचं वृत्त रशियन एजन्सीनं दिलं आहे.
तीन दिवस आधीही पुतीन यांनी मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला होता. जेव्हा रशियाच्या हितांचा विचार केला जाईल, तेव्हाच हा प्रश्न सुटेल, असं पुतीन यांनी मॅक्रॉन यांनी सांगितलं. रशियानं युक्रेनसमोर तीन अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
रशियानं कोणत्या तीन अटी ठेवल्या?
१, क्रीमिया रशियाचाच भाग असल्याचं युक्रेननं मान्य करावं
२. युक्रेनचं लष्करीकरण बंद व्हावं
३. युक्रेननं तटस्थ राहावं, नाटोचा सदस्य होऊ नये