कीव: रशिया आणि युक्रेन युद्धाचा सातवा दिवस आहे. दोन दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ, असा विश्वास सुरुवातीला रशियाला वाटत होता. मात्र आठवडा होत आला तरीही रशियन सैन्याला कीवचा ताबा घेता आलेला नाही. गेल्या सहा दिवसांत युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. रशियालादेखील हे युद्ध महागात पडतंय. युद्धाचा रशियन सैन्याच्या मनोधैर्यावर किती परिणाम झाला आहे ते आता त्यांच्या व्हिडीओ आणि मेसेजवरून समोर येऊ लागलं आहे.
युक्रेनवर हल्ला करण्यासाठी शिरलेल्या रशियन सैन्याची अवस्था बिकट आहे. रशियन सैन्याची मानसिक स्थिती दाखवणारे काही चॅट युक्रेनचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी सेर्गेय कायस्लायत्स यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाचून दाखवले. रशियाच्या आक्रमणाची तीव्रता किती आहे याचं गांभीर्य ओळखा, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
'आई, मी युक्रेनमध्ये आहे. इथं खऱ्या युद्धाला सुरुवात झाली आहे. मला भीती वाटतेय. आम्ही एकाचवेळी सर्व शहरांवर बॉम्ब टाकतोय. आम्ही नागरिकांनाही लक्ष्य करतोय,' असा मेसेज रशियाच्या एका सैनिकानं त्याच्या आईला केला होता. सैनिकानं मृत्यूपूर्वी त्याच्या आईसोबत साधलेला हा शेवटचा संवाद होता,' असं कायस्लायत्स यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करताना सांगितलं.
रशियन सैनिकाच्या आईनं त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर आम्ही प्रशिक्षण घेत नसून युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आलो आहोत आणि मला भीती वाटतेय, असं सैनिकानं आईला कळवलं. आता मला केवळ स्वत:ला फासावर लटकवून घ्यावंसं वाटतंय, अशा शब्दांत सैनिकानं त्याच्या मनातील अस्वस्थता, घालमेल आईकडे व्यक्त केली. तुला रिप्लाय देण्यासाठी इतका उशीर का झाला, अशी विचारणा आईनं केली. त्यावर 'मी क्रीमियामध्ये नाही. मी प्रशिक्षण शिबिरातही नाही. मी युक्रेनमध्ये आहे आणि इथं युद्ध पेटलंय,' असं उत्तर सैनिकानं आईला दिलं.