Russia vs Ukraine War: रासायनिक अस्त्रे वापरल्यास ‘नाटो’चे जशास तसे उत्तर; जो बायडेन यांचा रशियाला खणखणीत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:34 AM2022-03-26T06:34:08+5:302022-03-26T06:35:35+5:30
Russia vs Ukraine War: बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली.
ब्रुसेल्स : युक्रेनमध्ये रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास नाटो देश त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतील, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली.
बायडेन यांच्या वक्तव्याप्रमाणे परिस्थिती उद्भवल्यास नाटो व युरोपीय देशही युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात सुरू झाली आहे. युक्रेनमध्ये रशिया रासायनिक किंवा जैविक अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांकडून वारंवार होत आहे. युक्रेनवर आक्रमण होऊनही अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशाने युद्धात आतापर्यंत थेट हस्तक्षेप केलेला नाही.
जी-२० गटातून रशियाला काढून टाका
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियाला जी-२० गटातून काढून टाकले पाहिजे. जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी युरोपीय समुदाय व अन्य १९ देशांनी एकत्र येऊन जी-२० गटाची स्थापना केली आहे. मात्र, त्याच्या तत्त्वांना रशियाने हरताळ फासला, असे बायडेन यांनी सांगितले.
मारियुपोल हल्ल्यात ३०० जण ठार ?
गेल्या १६ मार्च रोजी मारियुपोल शहरातील एका चित्रपटगृहावर रशियाच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात सुमारे ३०० जण ठार झाले होते, असा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या लोकांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
जो बायडेन पोलंडमध्ये दाखल
युक्रेन युद्धामुळे युरोपच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी पोलंडमध्ये दाखल झाले. युक्रेनचा शेजारी देश असलेल्या पोलंडमध्ये अमेरिकी लष्कराच्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शत्रूंपासून पोलंडचे रक्षण करण्यासाठी त्या देशाच्या लष्कराला अमेरिकी सैनिक मदत करणार आहेत. पोलंडमध्ये २० लाख युक्रेन निर्वासित आश्रयाला आले आहेत. त्यांची स्थिती बायडेन यांनी जाणून घेतली, तसेच पोलंडमधील अमेरिकी सैनिकांशीही संवाद साधला.