Russia vs Ukraine War: आम्ही शेवटपर्यंत...; युक्रेनच्या अध्यक्षांचा पवित्रा अचानक बदलला, युद्ध आणखी पेटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:24 PM2022-03-09T18:24:36+5:302022-03-09T18:28:09+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांचा सूर अचानक बदलला; युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं
कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले सुरू आहेत. मात्र युक्रेन हार मानायला तयार नाही. बलाढ्य रशियन फौजांसमोर युक्रेनी सैनिक जीवाची बाजी लावून लढत आहेत. युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत असताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी काहीसा मवाळ पवित्रा घेतला. नाटोमध्ये जाण्यास स्वारस्य नसल्याचं जेलेन्स्की म्हणाले. त्यानंतर युद्ध संपेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र जेलेन्स्की यांनी त्यांचा पवित्रा अचानक बदलला आहे.
आम्ही शरणागती पत्करणार नाही. रशियन सैनिकांनी आपल्या मायदेशी निघून जावं. आम्ही आमच्या देशासाठी लढत राहू, असं म्हणत जेलेन्स्की यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता रशियन सैनिकांना शरणागती पत्करावी लागेल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेन सोडावं लागेल. कारण युक्रेनी सैन्य देशासाठी शेवटपर्यंत लढणार आहे, अशा शब्दांत जेलेन्स्की यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काही तासांपूर्वीच जेलेन्स्की यांनी रशियासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मात्र आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. युक्रेन सैन्यानं शरणागती पत्करल्यावरच युद्ध थांबेल, अशी अट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आधीपासूनच घातली आहे. मात्र युक्रेनचं सैन्य गुडघे टेकणार नसल्याचं जेलेन्स्की यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुतीन नरमले
युक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेन सरकार उखडून फेकून द्यावं असा आमचा उद्देश नाही, असं पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनसोबतची चर्चा आता पुढच्या टप्प्यात पोहोचली असल्याचंही याआधी रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. आता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.