नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. नाटो आणि रशियातील मतभेत केवळ संवादातून दूर होऊ शकतात. त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडवण्यात यावा, असं आवाहन मोदींनी पुतीन यांनी केलं. पंतप्रधान कार्यालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.
रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. आज रशियानं युद्धाची घोषणा करत युक्रेनवर हल्ले सुरू केले. त्यात आतापर्यंत ४० हून अधिक युक्रेनी नागरिकांचा जीव गेला आहे.
हिंसाचार थांबवून संबंधितांनी राजनैतिक मार्गानं चर्चा करायला हवी. संवादातून प्रश्न सोडवायला हवा, असं मोदी पुतीन यांना म्हणाले. यावेळी रशियन अध्यक्षांनी मोदींना युक्रेनमधील लष्करी कारवाईची माहिती दिली. पुतीन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी युक्रेनमधील भारतीयांबद्दल, विशेषत: विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदींनी पुतीन यांनी सांगितलं.
दोन्ही देशांचे अधिकारी आणि राजदूत एकमेकांच्या नियमित संपर्कात राहतील याची हमी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना दिली. तत्पूर्वी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.