Russia vs Ukraine: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियन सैन्यानं लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला युक्रेन लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. लाखो युक्रेन नागरिक देश सोडून निघाले आहेत. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.
नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी रशियाला लष्करी कारवाई थांबवण्याचं आवाहन केलं आहे. कारवाई सुरू ठेवल्यास परिणाम भोगण्याचा इशारा अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी युक्रेनला दिला आहे. मात्र रशिया माघार घेण्याच्या तयारीत नाही. युक्रेन नाटो संघटनेचा सदस्य होऊ इच्छित आहे. मात्र रशियाचा याला विरोध आहे. यावरूनच दोन्ही देश आमनेसामने आले आहेत.
रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष पेटला असताना दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची चर्चादेखील सुरू झाली आहे. लष्करी क्षमतेत रशिया युक्रेनपेक्षा कितीतरी पुढे आहे. रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब (FOAB) आहे. हा बॉम्बमध्ये आण्विक सामर्थ्याचा वापर करण्यात आलेला नाही. मात्र तो अतिशय शक्तिशाली आहे. गरज पडल्यास युक्रेनमध्ये याचा वापर करण्यात यावा, अशा सूचना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कराला दिल्या आहेत. ब्रिटिश माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
संरक्षण विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष पुतीन यांनी फादर ऑफ ऑल बॉम्बच्या वापराचे आदेश दिले आहेत, असं वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र मिररनं दिलं आहे. फादर ऑफ ऑल बॉम्बचा वापर झटका देण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी केला जाऊ शकतो. यात आण्विक शक्तीचा वापर झालेला नसला तरीही त्याचे परिणाम असतात. रशियाकडे असलेला बॉम्ब थर्मोबेरिक बॉम्ब आहे. ३०० मीटर परिसरात या बॉम्बमुळे नुकसान होऊ शकतं. २००७ मध्ये रशियानं हा बॉम्ब विकसित केला. त्यावेळी हा बॉम्ब अमेरिकेकडे असलेल्या बॉम्बपेक्षा चौपट शक्तिशाली होता.