Russia vs Ukraine War: जेलेन्स्कीला जाऊन सांगा, मी त्याला उद्ध्वस्त करेन! पुतीन यांची थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:57 AM2022-03-29T11:57:07+5:302022-03-29T11:58:47+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांच्याकडून रशियाला शांतता प्रस्ताव; पुतीन यांची थेट धमकी
मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये पेटलेलं युद्ध महिन्याभरानंतरही सुरूच आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. युक्रेन आठवड्याभरात गुडघे टेकेल असा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा अंदाज होता. मात्र पुतीन यांचा अंदाज साफ चुकला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी लढाऊ बाणा दाखवला. त्यानंतर आता पुतीन आक्रमक झाले आहेत.
रशियातील अब्जाधीश उद्योगपती आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्य रोमन अब्रामोविच यांनी नुकतीच पुतीन यांची भेट घेतली. जेलेन्स्कीला जाऊन सांगा मी त्यांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा पुतीन यांनी दिला. माझा निरोप जेलेन्स्कीला द्या, असं पुतीन यांनी अब्रामोविच यांना सांगितलं. जेलेन्स्की यांनी पुतीन यांना स्वहस्ते लिहिलेला शांतता प्रस्ताव पाठवला होता. त्यावर पुतीन यांनी थेट धमकी दिली.
जेलेन्स्की यांनी पुतीन यांच्या नावे शांतता प्रस्ताव पाठवला होता. युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनच्या असलेल्या अटींची सविस्तर माहिती त्यात होती. जेलेन्स्की यांनी प्रस्ताव अब्रामोविच यांच्याकडे सोपवला. अब्रामोविच यांनी तो पुतीन यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यावर पुतीन यांनी आक्रमक भूमिका घेतली. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबावं यासाठी अब्रामोविच यांचे प्रयत्न सुरू आहेत.
अब्रामोविच यांच्यावर युक्रेनमध्ये विष प्रयोग
युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच मार्चच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेले होते. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचा ते भाग होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांवर विष प्रयोग झाला.
अब्रामोविच रशियन नागरिक आहेत. त्यांच्यासह तिघांमध्ये अजब लक्षणं दिसून आली. त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. डोळे लाल झाले. हाताची त्वचा निघून जाऊ लागली. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ३ मार्चला रोमन अब्रामोविच यांच्यासह तिघांवर बैठकीनंतर विष प्रयोग झाला. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबावं. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अब्रामोविच प्रयत्नशील आहेत.