कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन तीन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपलेलं नाही. युक्रेनी सैनिकांनी रशियाला कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे रशियन सैन्याला अद्यापही राजधानी कीव्हवर ताबा मिळवता आलेला नाही. युक्रेनच्या लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्यानं रशियन सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे.
सध्या रशियाचे अनेक सैनिक युक्रेनचं लष्कर वापरत असलेल्या बंदुका शोधत आहेत. 'आम्ही युक्रेनी सैन्य वापरत असलेल्या ७.६२ एमएमच्या बुलेट्स शोधत आहोत. स्वत:ला जखमी करून घेण्यासाठी आम्हाला युक्रेनचं लष्कर वापरत असलेली शस्त्रं हवी आहेत. स्वत:ला जखमी करून घेतल्यावर मायदेशी परतता येईल. अनेक सैनिकांनी रशियात परतण्यासाठी हीच पद्धत वापरली आहे,' असं एका रशियन सैनिकानं त्याच्या आईला फोन करून सांगितलं. या कॉलचा ऑडियो रेकॉर्ड झाला आहे.
'युक्रेनी सैन्य वापरत असलेल्या शस्त्रांचा शोध रशियन सैनिक घेत आहेत. युक्रेनी शस्त्र सापडल्यावर माझे सहकारी सैनिक एकमेकांच्या पायावर गोळी झाडतील. त्यानंतर त्यावर मलमपट्टी करू. जखमी झालो असल्यानं आम्हाला दक्षिण रशियातल्या बुडेन्नोवस्क येथील रुग्णालयात पाठवण्यात येईल,' असं एका रशियन सैनिकानं त्याच्या आईला फोनवर सांगितलं.
पायावर मुद्दामहून गोळी झाडून आतापर्यंत १२० सैनिका रशियात परतले आहेत. आम्ही आता युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही. आमचं मनोधर्य खचलं आहे. आता जर युक्रेनच्या सैन्यानं आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही मारले जाऊ, अशा शब्दांत रशियन सैनिकानं त्याच्या आईकडे व्यथा मांडली. युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत रशियाचे ७ हजार सैनिक मारले गेल्याचा दावा पेंटागॉननं केला आहे. तर रशियाचे १४ ते २१ हजार सैनिक जखमी झाले आहेत.