कीव: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याचे प्रयत्न रशियन सैन्याकडून सुरू आहेत. युद्ध सुरू असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं एका स्वयंसेवकाला चांगलंच महागात पडणार होतं. सुदैवानं त्याचा जीव वाचला.
रशियाकडून हल्ले सुरू असताना इमारतीखाली एक तरुण उभा होता. तो व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. तितक्यात इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. त्यानंतर तरुण तिथून पळून गेला. एका छताखाली जात त्यानं आश्रय घेतला. यादरम्यान तरुणानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाबद्दलची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही.
मीडिया हाऊस असलेल्या नेक्स्टानं तरुणानं चित्रित केलेला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. स्वयंसेवक तरुण इमारतीखाली उभा राहून व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसत आहे. तितक्यात एका रॉकेटचा आवाज येतो. तरुण वर पाहतो. थोड्याच वेळात रॉकेट इमारतीवर कोसळतं. जोरदार आवाज होतो.
रॉकेट कोसळताच काचेचे तुकडे खाली पडतात. हे तुकडे तरुणाच्या अंगावर कोसळण्याआधी तो एका छताखाली जातो आणि स्वत:चा जीव वाचवतो. तरुणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.