मॉस्को: अमेरिका युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळा चालवत असल्याचा आरोप रशियानं केला आहे. प्रयोगशाळांमध्ये जैविक अस्त्रांची निर्मिती करण्यात येत असल्याचा रशियाचा दावा आहे. मात्र अमेरिकेनं जैविक अस्त्रांच्या निर्मितीचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता रशियानं एक नवा दावा केला आहे. रशियामध्ये जीवघेणे आजार पसरवण्यासाठी अमेरिका युक्रेनमध्ये पक्ष्यांना प्रशिक्षण देत असल्याचा रशियाचा दावा आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानं हे आरोप केले आहेत.
रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी गुरुवारी रशियन माध्यमांशी संवाद साधला. अमेरिकन सैन्य पक्ष्यांना एच5एन1 फ्ल्यू स्ट्रेन आणि न्यूकॅसल आजारांनी संक्रमित करण्याची योजना आखत असल्याचा आरोप कोनाशेनकोव यांनी केल्याचं वृत्त न्यूजवीकनं दिलं आहे. एच5एन1 फ्ल्यू स्ट्रेनचा मृत्यूदर ५० टक्के आहे. तर न्यूकॅसल हा अतिशय संक्रामक आणि घातक पक्षीरोग आहे. त्यामुळे थेट परिणाम श्वसन, पचनतंत्रावर होतो.
रशियन माध्यमांनी काही नकाशे, दस्तावेज आणि शस्त्र लादलेल्या पक्ष्यांचे फोटोदेखील प्रसिद्ध केले आहेत. रशियन सैन्य अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या खेरसॉनमध्ये काही संक्रमित पक्ष्यांना पकडल्याचा दावादेखील कोनाशेनकोव यांनी केला. अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात कबुतरांना प्रशिक्षण दिलं होतं. त्याला प्रोजेक्ट पिजन असं नाव देण्यात आलं होतं. बॉम्बला अचूक दिशा दर्शवण्यासाठी अमेरिका कबुतरांना प्रशिक्षण देत होता. मात्र या पक्ष्यांचा वापर युद्धभूमीवर झाला नाही. १९५३ मध्ये हा प्रकल्पच रद्द करण्यात आला.
जैविक संशोधन केंद्रं रशियाच्या हाती जाऊ नयेत यासाठी अमेरिका युक्रेनच्या मदतीनं काम करत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंडर सेक्रेटरी व्हिक्टोरिया न्यूलँड म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानानं खळबळ माजली होती. अमेरिका युक्रेनमध्ये जैविक अस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप यानंतर रशियानं केला होता.