Russia vs Ukraine War: युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना रशियाचा धक्का; पुतीन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:33 PM2022-02-28T22:33:42+5:302022-02-28T22:34:03+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनसोबत चर्चा सुरू असताना रशियन सरकारचा मोठा निर्णय
मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद जगभर पाहायला मिळतात. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. जर्मनी, नेदरलँडनं युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवली आहेत. युरोपियन युनियनमधील २७ देशांनी रशियाला आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे. ब्रिटन आणि कॅनडानंही असाच निर्णय घेतला आहे. यानंतर आता रशियानंदेखील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
रशियानं अनेक देशांना आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी केली आहे. ब्रिटन, जर्मनीसह ३६ देशांना हा निर्णय लागू आहे. निर्बंध घातलेल्या देशांच्या यादीतील देशांची विमानं केवळ विशेष परवाना असल्यावरच रशियन हवाई हद्दीचा वापर करू शकतात. रशियानं घातलेल्या निर्बंधांमुळे विमान प्रवासासाठीचा वेळ वाढेल आणि त्यामुळे तिकिटांचे दरदेखील वाढतील.
रशियाला क्रीडा क्षेत्रातून जोरदार दणका
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने (EB) सोमवारी बैठकीत चर्चा करून रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना दणका दिला. ऑलिम्पिक मोहिमे अंतर्गत काही नियमांचा करार केला जातो. त्या कराराचा व नियमांचा भंग करत रशियन सरकारने युक्रेनवर लष्करी चढाई केली. आणि रशियाला बेलारूसने दिलेल्या पाठिंब्यामुळे या दोन्ही देशांच्या खेळाडूंवर आगामी ऑलिम्पिकसाठी बंदी घालावी, अशी शिफारस एका विनंती पत्रकाच्या माध्यमातून कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिक समितीकडे केलं आहे.
युक्रेनची चिंता वाढली
रशिया आणि युक्रेनचा शेजारी असलेला आणि रशियाचा मित्र असलेल्या बेलारुसने सोमवारी रशियाला त्यांची अण्वस्त्रे आणि सैन्य बेलारुसमध्ये कायमस्वरुपी तैनात करण्यास परवानगी दिली आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी ही परवानगी दिली आहे. रशिया हा बेलारुसचा प्रमुख मित्र आहे आणि गेल्या आठवड्यात लुकाशेन्को यांनी रशियन सैन्याला बेलारुसचा भूभाग वापरुन उत्तरेकडून युक्रेनवर आक्रमण करण्याची परवानगी दिली होती. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर बेलारुसने अनेक अणुबॉम्ब साठवले होते. पण नंतर ते रशियाला परत करण्यात आले. आता पुन्हा एकदा रशियाची अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात होणार आहेत.