कीव्ह: रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. आठवड्याभरात युद्ध संपेल असा अनेकांचा अंदाज होता. पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आडाखे चुकल्यानं युद्ध लांबलं. आता युक्रेनच्या सैन्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख किरिलो बुडानोव यांना एक खळबळजनक दावा केला आहे. युद्धात अपयशी ठरलेलं रशियन सरकार युक्रेनचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करू शकतो, असा दावा बुडानोव यांनी केला.
आपण संपूर्ण युक्रेनचा घास घेऊ शकत नाही याची जाणीव पुतीन यांना झाली आहे. त्यामुळे कोरियाच्या धर्तीवर ते युक्रेनचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करतील, असं बुडानोव म्हणाले. १९४५ मध्ये कोरियाचं विभाजन होऊन दोन राष्ट्रं तयार झाली. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे दोन देश तयार झाले. पैकी उत्तर कोरियावर रशियाचा, तर दक्षिण कोरियावर अमेरिकेचा प्रभाव आहे.
रशिया त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचं रुपांतर अर्ध-राज्य संरचनेत करण्याचा प्रयत्न करेल. या भागाला स्वतंत्र युक्रेनविरोधात उभं करण्यात येईल. रशिया त्यांच्या ताब्यात गेलेल्या युक्रेनच्या शहरांमध्ये समांतर सरकारी ढाचा उभारेल आणि लोकांना युक्रेनी चलन रिव्नियाचा वापर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आम्ही रशियाशी गनिमीकाव्यानं लढू आणि त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रशियाचे अध्यक्ष पुतीन सत्तेत राहू शकत नाही, असं विधान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केलं होतं. मात्र फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपण बायडन यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं. तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मॅक्रॉन म्हणाले. युक्रेनमधील युद्ध थांबावं यासाठी मॅक्रॉन यांनी अनेकदा पुतीन यांच्याशी संवाद साधला आहे. मात्र अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही.