रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप तरी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता रशियाने मारिओपोलचे रुग्णालय ताब्यात घेतले असून तब्बल 400 जणांना ओलीस ठेवले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा सुरू राहणार आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत भेटतील.
रशियाने मारियुपोलमधील सर्वात मोठं रुग्णालय ताब्यात घेतलं आहे आणि जवळपास 400 लोकांना ओलीस ठेवले आहे. रशियन सैन्याने डॉक्टर आणि रुग्णांसह 400 लोकांना ओलीस ठेवले होते आणि त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त होत आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नाही हे देशातील जनतेनं स्वीकारायला हवं, असं जेलेन्स्की म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
युक्रेननं नाटोचा सदस्य होण्याच्या दिशेनं पावलं उचलल्यानं रशियानं आक्रमक पवित्रा घेतला. त्याचं रुपांतर पुढे युद्धात झालं. यानंतर आता युक्रेनच्या अध्यक्षांनी नाटोच्या सदस्यत्वाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. जेलेन्स्की यांनी मवाळ भूमिका घेतल्यानं रशियाविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे जेलेन्स्की यांनी मवाळ नरमाईची भूमिका घेतली असल्यानं दुसरीकडे रशिया आणि युक्रेनची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत रशियानं युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. त्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. राजधानी कीव्हवर रशियन फौजांनी आक्रमण केलं आहे. अनेक आघाड्यांवर रशियन सैन्य युक्रेनवर वरचढ ठरत आहे. त्यामुळे युक्रेनसमोरील अडचणी वाढल्या आहेत.