Russia vs Ukraine War: अणुप्रकल्पातील नवी प्रयोगशाळा रशियाने केली नष्ट; किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:13 AM2022-03-24T08:13:17+5:302022-03-24T08:14:33+5:30
प्रकल्पातील किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
लविव्ह : युक्रेनमधील चेर्नोबिल अणुप्रकल्पात उभारण्यात आलेली नवी प्रयोगशाळा रशियाच्या लष्कराने हल्ले करून नष्ट केली. अणुकचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन सुधारण्याकरिता ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली होती. या प्रकल्पातील किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
युक्रेन युद्धाच्या २७ व्या दिवशी ही घटना घडली आहे. या युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने चेर्नोबिल अणु प्रकल्पावर कब्जा केला होता. या प्रकल्पातील कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे. १९८६ साली चेर्नोबिल अणुप्रकल्पात मोठा अपघात होऊन किरणोत्सर्ग झाला होता. या प्रकल्पात युरोपीय समुदायाच्या सहकार्याने युक्रेनने ५० कोटी रुपये खर्चून ही नवी प्रयोगशाळा २०१५ साली उभारली होती. या प्रयोगशाळेत असलेले सर्व किरणोत्सारी पदार्थ व नमुने आता रशियाच्या ताब्यात गेले आहेत. ते या गोष्टींचा गैरवापर करणार नाही, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया युक्रेनने व्यक्त केली. किरणोत्सर्गाचे प्रमाण किती आहे, हे मोजणारी अणुप्रकल्पातील यंत्रणा बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
रशियावर नवे निर्बंध लादण्याचा विचार?
रशियावर आणखी निर्बंध लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा विचार आहे. या आठवड्यातील युरोपच्या दौऱ्यात बायडेन युक्रेन युद्धासंदर्भातील मुद्द्यांवर काही देशांच्या नेत्यांशी चर्चा करतील. बायडेन बुधवारी चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना झाले. रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनमधील लक्षावधी नागरिकांनी पोलंडसह शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे. बायडेन पोलंडलाही जाणार आहेत.
मदतपथकातील १५ जणांना ताब्यात घेतले
युद्धामुळे मारियुपोल शहरातील अत्यंत हालाखीत जगत असलेल्या लोकांना अन्नपाण्याचा पुरवठा करणाऱ्या मदतपथकातील १५ जणांना रशियाने ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप युक्रेनने केला आहे. मारियुपोलवर रशियाचे हवाई दल, नौदल हल्ले करत आहे. त्या शहरात सुमारे १ लाख लोक अडकून पडल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला होता.