मॉस्को: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. कालपासून सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी इशारे देऊन, निर्बंध लादूनही रशिया युद्ध थांबवण्यास तयार नाही. अशी परिस्थिती असताना आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
युक्रेनच्या सैन्यानं शरणागती पत्करल्यास रशिया चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना लावरोव यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. 'आम्ही वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार आहोत. युक्रेनच्या सैन्यानं शस्त्रं खाली ठेवल्यास चर्चा करण्याची आमची तयारी आहे,' असं लावरोव म्हणाले आहेत.
व्लादिमीर पुतीन यांनी केलेली कारवाई युक्रेनचं लष्करीकरण आणि नाझीकरण रोखण्यासाठी करण्यात आली आहे, असं लावरोव यांनी सांगितलं. युक्रेनवर कब्जा करण्याचा कोणाचाही इरादा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रशियन सैन्यानं युक्रेनमधील रहिवासी भागांवर हल्ले केल्याचा, पायाभूत प्रकल्पांचं नुकसान केल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.