Russia vs Ukraine War: युक्रेनसाठी आजची रात्र वैऱ्याची? रशिया घातपात घडवण्याच्या तयारीत, 'त्या' आदेशानं चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:30 PM2022-03-01T20:30:32+5:302022-03-01T20:38:37+5:30
Russia vs Ukraine War: रशियन फौजा कीवच्या दिशेनं; आज रात्री मोठा घातपात घडवण्याची तयारी
कीव: युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेता आलेली नाही. कीववर हल्ले करणाऱ्या रशियावर युक्रेनच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरल्यानंतर दोन दिवसांत कीव ताब्यात घेईल, असा विश्वास पुतीन यांना होता. मात्र जवळपास आठवडा होत आला तरी रशियन फौजेला कीववर ताबा मिळवता आलेला नाही. आज रात्री रशियन सैन्य कीववर कब्जा करेल असा अंदाज आहे. त्यादृष्टीनं रशियानं तयारी सुरू केली आहे.
खारकीववर जोरदार हल्ले केल्यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे, शस्त्रसज्ज वाहनं कीवच्या दिशेनं निघाली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री रशियाच्या फौजा कीववर निर्णायक हल्ला करू शकतात. रशियन लष्कराचा मोठा ताफा कीवकडे निघाला आहे. त्यामुळे आजची रात्र युक्रेनसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
दुसरीकडे रशियानं कीवमधील आपल्या नागरिकांना शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. आजच्या आज कीव शहरातून बाहेर पडा, असे आदेश रशियन सरकारकडून कीवमधील आपल्या नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे रशिया आज रात्रीच कीववर मोठा हल्ला करेल, अशी दाट शक्यता आहे.