मॉस्को: युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेता आलेली नाही. कीववर हल्ले करणाऱ्या रशियावर युक्रेनच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. यानंतर आता रशियन सैन्य आज रात्री कीववर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सायबेरियातील बंकरमध्ये लपवलं आहे. अणुयुद्धापासून कुटुंबाचा बचाव करण्यासाठी पुतीन यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा रशियन प्राध्यापकांनी केला आहे. पुतीन एका रोगानं ग्रस्त असल्याचा दावाही त्यांनी केला.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अल्ताई पर्वतामधील खास हाय टेक बंकरमध्ये पाठवल्याचा दावा ६१ वर्षीय प्राध्यापक वालेरी सोलोवी यांनी केला. अल्ताईमधील बंकरवर अणु हल्ल्याचा कोणताही परिणाम होत नाही. पुतीन शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करत असल्याचा दावाही प्राध्यापकांनी केला.
मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे (एमजीआयएमओ) माजी प्राध्यापक सोलोवी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर टीकेची झोड उठवली. युक्रेन युद्धावरून त्यांनी पुतीन यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांनी पुतीन यांच्या आजाराचाही उल्लेख केला. त्यामुळे रशियन अधिकाऱ्यांनी सोलोवी यांची सात तास चौकशी केली.