मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र त्यानंतरही रशियाच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. रशियन लष्करानं युक्रेनचं नुकसान केलं आहे. मात्र संपूर्ण युक्रेन ताब्यात घेण्यात रशियाला यश आलेलं नाही. त्यामुळेच आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनमधील आक्रमणाची जबाबदारी पुतीन यांनी रशियाच्या सशस्त्र दलाचे प्रमुख वालेरी गेरासिमोव यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आता जनरल गेरासिमोव त्यांचं एसी कार्यालय सोडून युक्रेनमध्ये जमिनीवर उतरले आहेत. एखाद्या युद्धात लष्करप्रमुख थेट युद्धभूमीत उतरतो, असं फारसं घडताना दिसत नाही. मात्र गेरासिमोव थेट मैदानात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुतीन आता आरपारच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गेरासिमोव युक्रेनमध्ये असून युद्धभूमीवर उतरून सैन्याचं नेतृत्त्व करत असल्याचं वृत्त आहे. मात्र रशियानं अद्याप या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. गेरासिमोव रशियाच्या सशस्त्र दलाचे प्रनुख आहेत. नोव्हेंबर २०१२ मध्ये पुतीन यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली. सध्या ते लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन लष्कराचं नेतृत्त्व गेरासिमोव थेट युद्धात उतरून करत आहेत.
अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या लष्करी साहित्याच्या, शस्त्रांच्या बळावर युक्रेननं रशियाला कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे दोन महिने उलटून गेल्यावरही युद्ध सुरू आहे. युक्रेन हार मानत नसल्यानं पुतीन संतप्त आहेत. युक्रेनला गुडघे टेकायला लावण्यासाठी आता त्यांनी संपूर्ण नेतृत्त्व गेरासिमोव यांच्याकडे सोपवलं आहे.