कीव्ह: युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याचे संकेत मिळालेले नाहीत. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंत पोहोचलं आहे. यादरम्यान काही रशियन सैनिक पकडले गेले आहेत. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत.
मायदेशी परतल्यास आम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी भीती पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांना वाटत आहे. रशियात परतल्यावर आम्हाला ठार केलं जाईल, असं रायफल विभागातील रशियन सैनिकानं कीव्हमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
आम्हाला रशियात आधीच मृत ठरवण्यात आलं असल्याचं सैनिकानं सांगितलं. 'काही दिवसांपूर्वीच मला माझ्या आई वडिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तिथे प्रशासनानं माझ्या अंत्यसंस्कारांची तयारी केली असल्याची माहिती मला त्यांनी दिली,' अशी माहिती एका सैनिकानं दिली.
युक्रेनच्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यानं आमच्या साथीदार सैनिकांनी आमच्यावर गौळ्या झाडल्याचं पकडलेल्या जवानांनी सांगितलं. २४ फेब्रुवारीला आम्हाला युक्रेनी नागरिकांवर झाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्या लेफ्टनंटनं एक महिला आणि तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्या. त्यात लेफ्टनंटचा मृत्यू झाल्याचं पकडलेल्या गेलेल्या रशियन सैनिकांनी सांगितलं.