कीव्ह: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. मात्र अद्यापही युद्ध सुरूच आहे. रशियन सैनिक युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर युक्रेनच्या सैनिकांनी रशियाची रसद तोडून त्यांना नामोहरम करण्यावर भर दिला आहे. युद्धभूमीवरील युक्रेनी सैनिकांनी रशियन सैनिकांच्या एका स्वयंपाकघरावर ताबा मिळवला. त्या स्वयंपाकघराची अवस्था पाहून रशियन सैनिकांचे होत असलेले हाल समोर आले.
युक्रेनी सैन्य स्वयंपाकघरांवरच कब्जा करू लागल्यानं रशियन सैन्याची अवस्था बिकट झाली आहे. युक्रेनी सैन्यानं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये बरेचसे रशियन सैनिक दिसत आहेत. एका ट्रकमध्ये सैनिक कसेबसे जेवत आहेत. रशियन सैनिकांची युद्धामुळे प्रचंड आबाळ होत असल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे. रशियन सैन्याकडे अन्नधान्याचा साठा संपत आला आहे. त्यामुळे पुरेशा जेवणाअभावी त्यांचे हाल सुरू आहेत.
रेडिटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रशियनं सैनिकांचं स्वयंपाकघर दिसत आहे. त्यातील कपाटांमध्ये आता केवळ कांदे, बटाटे शिल्लक राहिले आहेत. आठवड्याभरापूर्वीदेखील रशियन सैनिकांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात रशियन सैनिकांकडे रेशनची जुनी पाकिटं दिसत होती आणि आता सैनिकांना मिळत असलेलं अन्न फारसं दर्जेदार नसल्याचं दिसत आहे.