मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. दोन्ही देशांमधला तणाव कायम आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियाशी दोन हात करत आहे. युक्रेनी जवान मायभूमीच्या रक्षणासाठी लढत आहेत. त्यात आता युक्रेनी नागरिकही रशियन सैन्याची डोकेदुखी वाढवत आहेत.
युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे रशिया अडचणीत आला आहे. दोन दिवसांत युक्रेनची राजधानी ताब्यात घेऊ असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होता. मात्र तसं काहीच घडलेलं नाही. दुसऱ्या बाजूला जगभरातून रशियावर टीका होत आहे. अमेरिका, युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. प्रत्युत्तरादाखल रशियानंही युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर निर्बंध जाहीर केले. यानंतर आता रशियानं आपल्या रॉकेटवरून काही देशांचे ध्वज हटवले आहेत.रशियन अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ बैकोनूर येथील आहे. व्हिडीओमध्ये रशियाच्या स्पेस स्टेशनमधील कर्मचारी रॉकेटवर असलेले अनेक देशांचे झेंडे झाकताना दिसत आहेत. युक्रेनला पाठिंबा देत रशियावर निर्बंध लादणाऱ्या देशांचे ध्वज रशियन कर्मचाऱ्यांनी झाकून टाकले आहेत. मात्र भारतीय ध्वज झाकण्यात आलेला नाही. काही देशांच्या झेंड्यांशिवाय आमचं रॉकेट जास्त सुंदर दिसत आहे, असं रोगोझिन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनीनं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंधदेखील लादले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे. भारतानं युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिलं आहे. चर्चेतून मार्ग काढा, संवादातून प्रश्न सोडवा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारतानं रशियाविरोधात मतदान केलेलं नाही. भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे.