कीव्ह: रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. आठवड्याभरात युद्ध संपेल असा अनेकांचा अंदाज होता. पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आडाखे चुकल्यानं युद्ध लांबलं. युक्रेनी सैन्यानं बलाढ्य रशियाला कडवी लढत दिली. त्यामुळे रशियाचं प्रचंड नुकसान झालं. महिनाभर युद्ध सुरू असल्यानं आता रशियन सैनिक मेटाकुटीला आले आहेत. अनेक रशियन सैनिकांनी युक्रेनसमोर गुडघे टेकले आहेत.
साडे सात हजार डॉलर आणि युक्रेनचं नागरिकत्व द्या. त्याबदल्यात माझ्याकडे असलेला रशियाचा रणगाडा घ्या, असा प्रस्ताव एका रशियन सैनिकानं दिला. मिशा असं या सैनिकाचं नाव आहे. सहकारी सैनिक पळून गेल्यानंतर मिशानं युक्रेनी सैन्यासमोर पांढरं निशाण फडकावलं. त्यानं युक्रेनच्या लष्करासमोर शरणागती पत्करली.
लढत राहण्यात काहीच अर्थ नाही आणि मायदेशी परतल्यास मारले जाण्याची भीती, यामुळे मिशानं शरणागती पत्करल्याचं युक्रेनच्या अंतर्गत खात्याच्या मंत्रालयाचे सल्लागार असलेल्या व्हिक्टोर अँड्रुसिव्ह यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीच मिशानं आमच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर आम्ही याबद्दलची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला दिली, असं ते म्हणाले.
लष्करानं मिशाला एका ठिकाणी येण्यास सांगितलं. त्यानंतर ड्रोननं तो एकटाच असल्याची खात्री करून घेतली. युद्ध संपल्यानंतर त्याला बक्षिसाची रक्कम दिली जाईल. त्याला टीव्ही, फोन, स्वयंपाकघर, शॉवर अशा सुविधा देण्यात येतील. गेल्या काही दिवसांपासून रशियन सैन्यातील अनेक जण युक्रेनच्या प्रशासनाशी संपर्क साधून शरणागतीच्या प्रक्रियेची माहिती घेत आहेत. त्यांच्याकडे असणारी शस्त्रं आणि वाहनं जमा करण्याची परवानगी मागत आहेत.