मॉस्को/कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. युक्रेन आणि रशियाच्या लष्करी सामर्थ्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनी सैन्य काही दिवसांत गुडघे टेकेल असं वाटलं होतं. मात्र युक्रेनी सैन्यानं रशियाला चांगली टक्कर दिली. त्यामुळे रशियन सैन्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यातच आता थंडीमुळे रशियन फौजांच्या अडचणी वाढल्या आहेत.
युक्रेनची राजधानी कीव्हवर आक्रमण करण्यासाठी रशियाचा लष्करी ताफा निघाला होता. रशियाचा ताफा तब्बल ६४ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र हा ताफा आता मोठ्या संकटात सापडला आहे. युक्रेनमधील तापमान घसरत असल्यानं रणगाडे आणि लष्करी वाहनांमधील सैनिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. युक्रेनमधील तापमान आणखी घसरण्याची शक्यता असल्यानं पुढील परिस्थिती रशियन सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते.
पूर्व युरोपात आता तापमान घसरण्यास सुरुवात झाली आहे. कीव्हमध्ये रात्रीचं तापमान उणे १० अंशांपर्यंत घसरेल. तर खारकीव्हमध्ये उणे २० पर्यंत तापमान जाईल. त्यामुळे रशियन सैनिकांची अवस्था बिकट होईल. सध्या रशियन सैन्याचा ताफा कीव्हपासून २० मैलांवर आहे. तांत्रिक समस्या, इंधन पुरवठा आणि युक्रेनकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकारामुळे हा ताफा अडकून पडला आहे.
थंडी वाढेल तशी परिस्थिती अवघड होईल. यानंतर रशियन रणगाडे ४० टनांचे फ्रिजर ठरतील. घटणाऱ्या तापमानाचा थेट परिणाम सैनिकांच्या मनोधैर्यावर होईल. कारण आर्टिक प्रकारच्या युद्धपद्धतीची सवय त्यांना नाही, असं ब्रिटिश लष्कराचे निवृत्त मेजर केविन प्राईस यांनी सांगितलं. तापमान इतकं घसरेल, असा अंदाज रशियन सैन्याला आलेला नसेल.
रशियन सैन्याच्या ताफ्याकडे पुरेसं इंधन नाही. त्यातच तापमान घसरत आहे. रात्रीच्या वेळी रणगाडे चालत नसतील, तर ते केवळ फ्रीज ठरतात. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा निभाव लागणं अवघड आहे, असं बाल्टिक सुरक्षा फेडरेशनचे वरिष्ठ संरक्षण तज्ज्ञ ग्लेन ग्रँट यांनी सांगितलं. ताफ्यानं वेग न घेतल्यास अनेक सैनिकांना मृत्यू टाळण्यासाठी माघार घ्यावी लागेल, असं ग्रँट म्हणाले.