Zelensky Address US Congressmen : देशाचं स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यासाठी आणखी लढाऊ विमान पाठविण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे. यावेळी राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की भावूक झालेले पाहायला मिळाले. जेलेन्स्की यांनी शनिवारी अमेरिकी खासदारांना खासगीपातळीवर व्हिडिओ कॉल करुन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यात जेलेन्स्की यांनी कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल, असंही म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून जेलेन्स्की यांना मारण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले गेले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की सध्या राजधानी कीव्हमध्ये ठाण मांडून बसले आहेत. कीव्हच्या उतरेकडे रशियन सैन्याच्या फौजा येऊन पोहोचल्या आहेत. युक्रेनची हवाई हद्द सुरक्षित करण्याची खूप गरज आहे आणि नाटो कडून नो-फ्लाय-झोन घोषीत केल्यानं किंवा अधिक लढाऊ विमानं पाठवण्यात आली तरच हे शक्य आहे, असं जेलेन्स्की यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.
'नाटो'ला लढाई तीव्र होण्याची भीतीजेलेन्स्की यांच्याकडून युक्रेनची हवाई हद्द नो-फ्लाय-झोन घोषीत करण्याची मागणी केली जात आहे. पण असं पाऊल उचलल्यानं युद्ध आणखी तीव्र होईल असं 'नाटो'चं म्हणणं आहे. जेलेन्स्की यांनी जवळपास तासभर अमेरिकेच्या ३०० खासदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या स्टाफसोबतही चर्चा केली. युक्रेनच्या शहरांवर आता रशियाकडून जोरदार बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनची हवाई हद्द सुरक्षित करण्यासाठी जेलेन्स्की प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत १४ लाखाहून अधिक यु्क्रेनियन नागरिकांना इतर देशांमध्ये आसरा घेतला आहे.
जेलेन्स्की यांची भावूक मागणी"जेलेन्स्की यांनी अगदी भावूक होऊन मदतीचं आवाहन केलं आहे", असं अमेरिकेच्या सीनेटचे सदस्य चक शूमर यांनी सांगितलं. अमेरिकेनं पूर्व युरोपिय भागीदाऱ्यांच्या मदतीनं लढाऊ विमानांची मदत करावी अशी जेलेन्स्की यांची इच्छा आहे. "जितकं शक्य होईल तितकी संपूर्ण मदत जेलेन्स्की यांना केली जाईल", असंही शूमर म्हणाले. समोर आलेल्या माहितीनुसार पोलंडकडून युक्रेनला मिग-२९ आणि सुखोई-२५ लढाऊ विमानं देणार आहे. याबदल्यात त्यांनी अमेरिकेकडून एफ-१६ फायटर जेटची मागणी केली आहे.