Russia vs Ukraine War: युक्रेन सुधारला नाही तर...; युद्ध सुरू असताना पुतीन यांची थेट अन् स्पष्ट शब्दांत धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 10:51 PM2022-03-05T22:51:57+5:302022-03-05T22:57:10+5:30
Russia vs Ukraine War: अमेरिका आणि युरोपियन देशांनी जाहीर केलेले निर्बंध युद्ध पुकारण्यासारखेच; पुतीन स्पष्टच बोलले
मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन १० दिवस झाले आहेत. गेल्या १० दिवसांत बलाढ्य रशियाला युक्रेननं कडवी लढत दिली आहे. या युद्धावर प्रथमच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केलं आहे. युक्रेनमध्ये विशेष सैन्य मोहिम राबवण्याचा निर्णय कठीण होता, असं पुतीन म्हणाले. युक्रेनचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याची मोहिम जवळपास पूर्ण झाल्याचं पुतीन यांनी सांगितलं.
डोनबॉस प्रकरण शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण युक्रेननं खोडा घातला. रशियावर लादण्यात आलेले निर्बंध युद्धाच्या घोषणेसारखेच होते, अशा शब्दांत त्यांनी अमेरिका आणि युरोपियन देशांच्या निर्बंधांवर भाष्य केलं. 'युक्रेनवर नो फ्लाय झोनची घोषणा करणं युद्धाची घोषणा करण्यासारखंच आहे. युक्रेननं सर्वसामान्य नागरिकांचा वापर ढाल म्हणून केला,' असा आरोप पुतीन यांनी केला.
युक्रेन सुधारला नाही, तर त्याचं भविष्य धोक्यात आहे, अशी थेट आणि स्पष्ट धमकीच पुतीन यांनी दिली. त्यामुळे पुढील काही दिवसांत रशियन सैन्याचे हल्ले आणखी तीव्र होणार असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे सैनिक देशासाठी लढत आहेत. अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या लष्करी साहित्याच्या आधारे युक्रेनी सैन्य रशिय सैन्याविरोधात निकराचा लढा देत आहे.