Russia vs Ukraine War: रशियाविरोधात होणार सर्वात मोठी कारवाई? ब्रिटननं सुरू केली तयारी, स्पष्ट संकेत दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 07:45 PM2022-03-01T19:45:19+5:302022-03-01T19:45:36+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाला मोठा धक्का देण्याची तयारी
लंडन: रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. राजधानी कीवच्या बाहेर दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने आलं आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियानं नागरी वस्त्यांमध्ये हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या या लष्करी कारवाईचा जगभरातून निषेध होत आहे. दरम्यान कीवच्या बाहेर युक्रेनी सैन्यानं अतुलनीय शौर्य दाखवत रशियन सैन्याचा ताफा उद्ध्वस्त केला आहे.
एका बाजूला युक्रेनी सैन्य मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया एकाकी पडू लागला आहे. अमेरिका, युरोपियन युनियननं रशियावर व्यापारी निर्बंध लादले. अनेक देशांनी युक्रेनला लष्करी साधनसामग्रीची मदत केली. यानंतर आता रशियावर सर्वात मोठी कारवाई करण्याची तयारी ब्रिटननं सुरू केली आहे.
UK says evicting Russia from UN Security Council among 'all options' on table: AFP
— ANI (@ANI) March 1, 2022
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन आणि फ्रान्स परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. तर इतर सदस्य अस्थायी २ वर्षांसाठी निवडले जातात. स्थायी सदस्यांना व्हिटोचा अधिकार असतो. त्यामुळे हे सदस्य त्याचा वापर करून कोणताही प्रस्ताव हाणून पाडू शकतात. युक्रेनवरील रशियाच्या कारवाईच्या निषेधार्थ परिषदेत प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र रशियानं व्हिटोचा वापर करून तो हाणून पाडला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे, असं ब्रिटननं म्हटलं आहे. याआधी ब्रिटननं रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. रशियाशी संबंधित कोणत्याही जहाजाला ब्रिटनच्या बंदरांवर प्रवेश नाही. रशियन ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाला बंदरांवर प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा ब्रिटननं कालच केली.