कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन एक महिना होत आला आहे. मात्र अद्यापही युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. रशियासमोर युक्रेन गुडघे टेकेल असं जगातील अनेकांना वाटत होतं. मात्र बलाढ्य रशियाला युक्रेनी सैन्यानं कडवी लढत दिली. त्यानंतर आता रशियाकडून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. मात्र तो प्रयत्न उधळण्यात युक्रेनमधील पोलिसांना यश आलं आहे.
स्लोवाकियाला लागून असलेल्या युक्रेनच्या सीमेवर २५ जणांना अटक करण्यात आली. पश्चिम युक्रेनमधून २५ जण युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेनं निघाले होते. या व्यक्तींसोबत रशियाच्या गुप्तहेर सेवेतील एक एजंट होता. जेलेन्स्की यांची हत्या करण्याचे आदेश २५ जणांना देण्यात आले होते.
उझगोरोड सीमेवर २५ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे याची माहिती युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेला रशियन गुप्तचर यंत्रणेतील एका गटानं दिली होती. हा गट युद्धविरोधी आहे. पुतीन यांनी घेतलेला युद्धाचा निर्णय त्यांना आवडलेला नाही. रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसल्यापासून जेलेन्स्की यांना जीवे मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे.
बलाढ्य रशियासमोर युक्रेनचं सैन्य काही दिवसांत शरणागती पत्करेल असा कयास होता. मात्र जेलेन्स्की यांनी रशियाविरोधात कठोर भूमिका घेत झुकणार नाही असा पवित्रा घेतला. जेलेन्स्की यांच्या लढाऊ बाण्याचं जगभरात कौतुक झालं. मात्र त्यांच्या याच बाण्यामुळे ते रशियाच्या रडारवर आहेत. जेलेन्स्की यांच्यासोबतच युक्रेनच्या पंतप्रधानांनादेखील रशियाकडून धोका आहे.