नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम युद्धभूमीवर दिसू लागला आहे. बलाढ्य रशियन फौजांना युक्रेनचे सैनिक मोठ्या हिमतीनं तोंड देत आहेत.
अमेरिकेनं तयार केलेल्या स्टिंगर क्षेपणास्त्रानं रशियन फौजेचं मोठं नुकसान केलं आहे. जर्मनी आणि नेदरलँडनंदेखील युक्रेनला स्टिंगर क्षेपणास्त्रं पुरवली आहेत. स्टिंगर क्षेपणास्त्र मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टिम आहे. पृष्ठभागावरूव हे क्षेपणास्त्र डागता येतं. या क्षेपणास्त्राच्या मदतीनं हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं, रणगाडे उडवता येतात.
स्टिंगर क्षेपणास्त्राचे १३ प्रकार उपलब्ध आहेत. त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं होतो. स्टिंगर बेसिक, स्टिंगर पॅसिव्ह ऑप्टिकल सीकर टेक्निक, स्टिंगर रिप्रोग्रामेबल मायक्रोप्रोससर हे तीन प्रमुख प्रकार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात इंफ्रारेड आणि अल्ट्रावॉयलेट व्हिजनच्या मदतीनंही क्षेपणास्त्र डागता येतं. त्यामुळे अंधारातही हल्ला करता येऊ शकतो.
स्टिंगर क्षेपणास्त्र हलकं आणि प्रभावी आहे. खांद्यावर ठेऊन या मशीनमधून क्षेपणास्त्र डागता येतं. बेसिक स्टिंगरचं वजन १५.१९ किलो इतकं आहे. यामध्ये क्षेपणास्त्राच्या १०.१ किलोचा समावेश आहे. म्हणजेच लॉन्चरचं वजन केवळ ५ किलो आहे. याची लांबी १.५२ मीटर असते. स्टिंगर खांद्यावर ठेऊन एखादी व्यक्ती सहज चालू शकते.
स्टिंगरच्या RMP व्हर्जनचा समावेश जगातील सर्वात अचूक शस्त्रांमध्ये होतो. त्याची अचूकता ९० टक्के इतकी आहे. सुपरसॉनिक वेगानं क्षेपणास्त्र लक्ष्याचा वेध घेतं. कारगिल युद्ध, अफगाणिस्तान युद्ध, इराक युद्ध, सीरिया युद्धात स्टिंगरचा वापर झाला आहे.