Russia vs Ukraine War: झुकेंगे नहीं! युक्रेनच्या सैनिकांचा शरणागतीस नकार; लढत राहण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:17 AM2022-03-22T06:17:05+5:302022-03-22T06:24:11+5:30
रशिया मारियुपोलवर कब्जा करण्यासाठी आणखी जोरदार हल्ले करण्याची शक्यता
कीव्ह : मारियुपोलमध्ये युक्रेनच्या सैनिकांनी रशियाला शरण येण्यास नकार दिला असून, यापुढेही लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांना शरणागती पत्करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपल्याने आता रशिया मारियुपोलवर कब्जा करण्यासाठी आणखी जोरदार हल्ले करण्याची शक्यता आहे. कीव्ह येथील एका मॉलवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सहाजण ठार झाले आहेत.
या युद्धाच्या २६व्या दिवशी रशियाने कीव्ह, मारियुपोल आदी शहरांवर आणखी तीव्र हल्ले चढवले. मारियुपोलमध्ये युक्रेनचे सैनिक शरण आल्यास त्यांना सुरक्षितपणे शहराच्या बाहेर जाऊ देण्यात येईल, असा रशियाने मांडलेला प्रस्ताव युक्रेनने धुडकावून लावला.
रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये मारियुपोल शहराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो लोकांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. त्या देशातील अझोव्ह या शहरात एका शाळेच्या इमारतीमध्ये ४०० नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्या शाळेवरही बॉम्बचा मारा करण्यात आला. या हल्ल्याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी तीव्र निषेध केला आहे.
सुमीमध्ये अमोनियाची गळती
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या सुमी शहरात एका रासायनिक प्रकल्पातून अमोनिया वायूची गळती झाली. त्यामुळे या कारखान्यापासून २.५ किलोमीटरच्या परिसरात वायू प्रदूषणात वाढ झाली. अमोनिया वायूची गळती नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली, ते अद्याप समजू शकलेले नाही.