कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. गेल्या महिन्याभरात रशियन फौजांनी युक्रेनचं अतोनात नुकसान केलं आहे. यानंतर आता रशियन सैन्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र रशियन सैन्याची रणनीती युक्रेन सैनिकांच्या जीवावर उठली आहे.
रशियन सैनिक माघार घेत असताना सुरुंग पेरत आहेत. रशियन सैनिकांचे मृतदेह, युक्रेनी नागरिकांच्या प्रेतांजवळ रशियन सैन्यानं सुरुंग ठेवले आहेत. त्यामुळे या मृतदेहांजवळ जाणारे युक्रेनी सैनिक जखमी होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हच्या आसपास अनेक ठिकाणी सुरुंग पेरण्यात आले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी हा आरोप केला आहे.
रशियन सैनिक घरांमध्ये, घरातल्या साहित्यांमध्ये, इतकंच नाही तर लोकांच्या मृतदेहांजवळदेखील सुरुंग पेरत माघार घेत आहेत. चेर्निहाईव्हचे राज्यपाल वियातेस्लाव चौस यांनीदेखील जेलेन्स्की यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. मात्र यावर अद्याप रशियन संरक्षण मंत्रालयानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पश्चिम युक्रेनची राजधानी दिमित्रिक्वामधून एका दिवसात १५०० पेक्षा अधिक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.