Russia vs Ukraine War: युक्रेनचा जुग्गाड! आता बीयरच्या बाटल्या रशियन सैन्यावर बरसणार; संपूर्ण कारखाना लागला कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:54 PM2022-02-28T18:54:23+5:302022-02-28T18:54:42+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनच्या सैन्याच्या मदतीला नागरिक; बलाढ्य रशियाचा सामना करण्यासाठी सज्ज
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम युद्धभूमीवर दिसू लागला आहे. बलाढ्य रशियन फौजांना युक्रेनचे सैनिक मोठ्या हिमतीनं तोंड देत आहेत.
एका बाजूला सैनिकांनी आघाडी सांभाळली असताना दुसऱ्या बाजूनं नागरिक नेटानं लढत आहेत. युक्रेनच्या अध्यक्षांनी नागरिकांना देशासाठी लढण्याचं आवाहन केलं. यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले. अनेकांनी देशासाठी शस्त्रं हाती घेतली. लोकांनी मोलोटोव कॉकटेल पेट्रोल बॉम्ब तयार करावेत, असं आवाहन आता सरकारनं केलं आहे. यानंतर युक्रेनमधील एका बीयर कंपनीनं तर बीयरच्या जागी मोलोटोव कॉकटेल पेट्रोल बॉम्बची निर्मिती सुरू केली आहे.
युक्रेनमधील Lviv शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. पोलंडच्या सीमेजवळ शहर वसलेलं आहे. रशियन सैन्य शहरावर हल्ला चढवेल अशी भीती इथल्या नागरिकांना आहे. त्यामुळे नागरिक शहराच्या संरक्षणासाठी सज्ज झाले आहेत. रशियन सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी Pravda Brewery च्या कर्मचाऱ्यांनी बीयरच्या जागी मोलोटोव कॉकटेल पेट्रोल बॉम्बची निर्मिती सुरू केली आहे. कंपनीच्या मालकांनी फेसबुकच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
कोणाला तरी हे करावं लागणारच होतं. ते आम्ही करत आहोत, असं Pravda Breweryचे मालक Yuriy Zastavny यांनी म्हटलं. 'आमच्याकडे कौशल्य आहे. त्याचा वापर आम्ही देशासाठी करत आहोत. याआधी २०१४ मध्येदेखील आम्ही मोलोटोव कॉकटेल बॉम्ब तयार केले होते. आम्ही आमच्या देशासाठी प्राणपणानं लढू. त्यासाठी शक्य ते सगळं करू,' असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.