Russia vs Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला; रशियात घुसून एअरस्ट्राईक; हेलिकॉप्टर्सनी तेलाचा डेपो उडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:28 AM2022-04-01T11:28:44+5:302022-04-01T11:29:00+5:30
Russia vs Ukraine War: रशियात घुसून युक्रेनच्या हेलिकॉप्टर्सनी रॉकेट्स डागली; तेल डेपोला भीषण आग
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हं सध्यातरी दिसत नाहीत. रशियाच्या तुलनेत कमकुवत असलेलं युक्रेनचं सैन्य आठवड्याभरात शरणागती पत्करेल असा व्लादिमीर पुतीन यांचा अंदाज होता. मात्र तो साफ चुकला. युक्रेनच्या लष्करानं कडवी लढत देत रशियन फौजांचं मोठं नुकसान केलं. यानंतर आता युक्रेनी सैन्यानं थेट रशियात घुसून मोठी कारवाई केली आहे.
युक्रेनी हेलिकॉप्टर्सनी रशियातील तेलाचं भांडार उडवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रशियाच्या प्रादेशिक राज्यपालांनीच ही माहिती दिली आहे. रशियातील बेलगोरोड शहरात असलेलं इंधन साठवण केंद्रावर युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी हल्ला केला आहे. राज्यपाल व्याचेस्लाव ग्लाडकोव्ह यांनी ही माहिती दिली. ग्लाडकोव्ह यांची नियुक्ती रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी २०२० मध्ये केली आहे.
बेलगोरोड शहर युक्रेन आणि रशियाच्या सीमेजवळ आहे. युक्रेन सैन्याच्या हल्ल्यानंतर इंधन साठवण केंद्राला आग लागली. त्यात दोन कर्मचारी जखमी झाले. यानंतर परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. बेलगोरोड शहराची लोकसंख्या जवळपास पावणे चार लाख आहे. हे शहर युक्रेनच्या सीमेपासून २५ किमी अंतरावर आहे. युक्रेन सरकारनं अद्याप तरी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
या आठवड्याच्या सुरुवातीलादेखील युक्रेननं बेलगोरोडवर हल्ला केल्याचं वृत्त आलं होतं. या भागात असलेल्या शस्त्रागारात स्फोट झाला. हा स्फोट युक्रेननं घडवून आणल्याची चर्चा होती. मात्र हा स्फोट मानवी चुकीमुळे झाल्याचं नंतर समोर आलं.