कीव: बलाढ्य रशियाच्या आक्रमणासमोर युक्रेनचा निभाव लागताना दिसत नाही. कालपासून सुरू झालेल्या युद्धात युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं आहे. रशियाच्या ताकदीसमोर युक्रेन एकाकी पडला आहे. पण तरीही युक्रेनचे सैनिक जीवाची बाजी लावत आहेत. या दरम्यान काही ठिकाणी भावुक करणाऱ्या घटना घडत आहेत. क्रिमियामध्ये एका युक्रेनी सैनिकानं रशियन सैन्याला रोखण्यासाठी स्वत:ला एका पुलासोबत उडवलं. त्यामुळे रशियन सैन्याच्या ताफ्याला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.
पुलासोबत स्वत:ला उडवणाऱ्या सैनिकाचं नाव विटाली शकुन असं आहे. विटाली यांच्यावर क्रिमिया सीमेवरील खेरसॉन क्षेत्रातील हेनिचेस्क पुलाच्या रक्षणाचं काम देण्यात आलं होतं. समोरून येणारं रशियन सैन्य पुलावरूनच येणार हे नक्की होतं. त्यांना रोखायचं असल्यास पूल उद्ध्वस्त करावा लागणार होता. त्यासाठी पुलाच्या चारही बाजूंना स्फोटकं लावण्यात आली.
विटाली शकुनी यांनी पूल उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक असलेली स्फोटकं लावली. मात्र पुलावरून निघण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. रशियन सैन्य कधीही तिथे पोहोचू शकणार होतं. त्यामुळे विटाली यांनी स्वत:सह पूल उडवला. पूल उडवताच आपला मृत्यू होणार याची कल्पना विटाली यांना होती. मात्र देशाच्या रक्षणासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
जनरल स्टाफ ऑफ आर्म्ड फोर्सेस यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विटाली यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती दिली. 'आपण पूल उडवत असल्याचा मेसेज विटाली यांनी दिला. त्यानंतर स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. स्फोटात विटाली शहीद झाले. मात्र त्यांच्यामुळे रशियन सैन्य रोखलं गेलं. पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम करावे लागले,' अशा शब्दांत जनरल स्टाफ ऑफ आर्म्ड फोर्सेस घडलेली घटना पोस्टच्या माध्यमातून सांगितली.