कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून दोन महिने होत आले आहेत. युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत मिळताना दिसत नाहीत. दोन्ही देशांचं युद्धात प्रचंड नुकसान झालं आहे. बलाढ्य रशियन लष्कराला युक्रेनी सैन्यानं कडवी लढत दिली आहे. युक्रेनच्या लष्करानं रशियाचे अनेक रणगाडे, लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली आहेत. युक्रेनी लष्कराचा पराक्रम दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
उद्ध्वस्त झालेल्या एका इमारतीच्या पलीकडे असलेल्या रशियन लष्करी वाहनाचा युक्रेनच्या रणगाड्यानं अचूक वेध घेतला. युक्रेनच्या रणगाड्यानं डागलेला तोफगोळा उद्ध्वस्त इमारतीच्या मधून गेला आणि रशियन सैन्याच्या वाहनावर जाऊन आदळला. पुढच्या काही क्षणांत त्या वाहनानं पेट घेतला. पूर्व युक्रेनमधील रुबेझ्ने शहरात ही घटना घडली.
रुबेझ्ने शहरात युक्रेन आणि रशियाचं लष्कर आमनेसामने होतं. रशियाकडून हल्ला होण्यापूर्वीच युक्रेनच्या रणगाड्यानं हल्ला चढवला. दोन्ही सैन्यामध्ये एक मोडकळीस आलेली इमारत होती. या इमारतीमधून दोन्ही देशांच्या लष्कराच्या तुकड्या एकमेकांना दिसत होत्या. तोफगोळा डागल्यास रशियाचं वाहन उडवता येऊ शकतं, असा अंदाज युक्रेनी लष्कराचा रणगाडा चालवत असलेल्या सैनिकानं बांधला.
पुढच्याच क्षणाला त्यानं तोफगोळा डागला. हा तोफगोळा मोडकळीस इमारतीच्या मधून गेला आणि त्यानं रशियन लष्कराच्या वाहनाचा वेध घेतला. रशियाच्या वाहनाला भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.