Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात महिन्याभरात रशियाचं किती नुकसान?; समोर आला मोठा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 09:16 AM2022-03-25T09:16:24+5:302022-03-25T09:17:06+5:30
रशियाचेही भाजले हात; युक्रेन युद्धाच्या महिन्यानंतर नाटोचा दावा
कीव्ह/मॉस्को : युक्रेन युद्धाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून, या युद्धात रशियाचे आतापर्यंत ७ ते १५ हजार सैनिक ठार झाले असल्याचा दावा नाटो या संघटनेने केला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे किती सैनिक ठार झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, हेरगिरी केल्याच्या आरोपावरून रशियाच्या ४५ राजनैतिक अधिकाऱ्यांची पोलंडने तर रशियाने काही अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सल्लागार ॲनातोली चुबाइस यांनी युक्रेन युद्धाला विरोध करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
चुबाइस यांची बदली
दुसऱ्या खात्यामध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आता सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. पुतिन यांच्या निर्णयांना रशियामधूनही विरोध होत असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले.
अमेरिकींची हकालपट्टी
रशियाने अमेरिकेच्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियाच्या १२ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाला रशियाने आता प्रत्युत्तर दिले आहे.