Russia vs Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनं युक्रेनला काय काय दिलं? संपूर्ण यादीच समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:09 PM2022-03-05T18:09:41+5:302022-03-05T18:10:33+5:30
Russia vs Ukraine War: अमेरिकेनं युक्रेनला पुरवलेल्या शस्त्रांची भलीमोठी यादी
कीव्ह: युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाचा आजचा दहावा दिवस आहे. या दहा दिवसांत युक्रेननं बड्या रशियाला अनेक धक्के दिले आहेत. बलाढ्य रशियन सैन्याला युक्रेनच्या सैन्यानं चांगली लढत दिली आहे. युक्रेनचं सैन्य रशियावर अवघ्या काही दिवसांत गुडघे टेकेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र युक्रेननं भल्याभल्यांचे अंदाज चुकवले.
अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारे युक्रेनी सैन्यानं रशियाला जबर धक्के दिले. अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या शस्त्रास्त्रांची यादी समोर आली आहे. यामध्ये अँटी टँक, अँटी एअर आणि अँटी आर्मर्ड क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकेनं डिसेंबरपासूनच युक्रेनी सैन्याला शस्त्रास्त्रं पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनं युक्रेनी सैन्याला शॉटगन आणि स्पेशल सूटदेखील पुरवले.
वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, बायडन प्रशासनानं गेल्या आठवड्यांपूर्वी युक्रेनला स्टिंगर क्षेपणास्त्र यंत्रणा, अँटी टँक जॅवलिन क्षेपणास्त्र आणि दारुगोळ्याचा पुरवठा वाढवला. रशियाचा पराभव करण्यासाठी अमेरिकेनं युक्रेनला कशाप्रकारे मदत केली हे यातून दिसून आलं आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की सातत्यानं अमेरिका आणि नाटोकडे सैन्य आणि शस्त्रं पाठवण्याची मागणी करत आहेत. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन अनेकदा सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेकडून सातत्यानं युक्रेनला लष्करी मदत पाठवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. अमेरिकेकडून मिळालेल्या शस्त्रांच्या मदतीनं युक्रेननं रशियन लष्कराला धक्के दिले. युक्रेनला दिली गेलेली पाहता, त्यांना नेमक्या कोणत्या शस्त्रांची गरज लागणार, याची कल्पना रशियाला आधीपासूनच होती, हे स्पष्ट होत आहे.