Russia vs Ukraine War: रशियावर दबावासाठी बायडेन युरोपात दाखल; पाश्चिमात्य देश आणखी निर्बंध लादण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:29 AM2022-03-25T06:29:38+5:302022-03-25T06:30:03+5:30
बायडेन हे जी-सात गटातील देशांच्या बैठकीतही युक्रेनसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. युक्रेन युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे.
ब्रुसेल्स : युक्रेनविरोधातील युद्ध रशियाने थांबवावे यासाठी दबाव वाढविण्याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युरोपमध्ये दाखल झाले असून गुरुवारी नाटो देशांच्या बैठकीत ते सहभागी झाले. अमेरिका व अन्य पाश्चिमात्य देशांनी याआधीच रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र युरोपच्या दौऱ्यात बायडेन यांनी रशियाविरोधात अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अमेरिकी जनतेेनेही व्यक्त केली आहे.
बायडेन हे जी-सात गटातील देशांच्या बैठकीतही युक्रेनसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. युक्रेन युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे युद्ध थांबविण्यास तयार नाहीत. नाटोमध्ये सामील होणार नाही, असे युक्रेनने मान्य केल्यास युद्ध थांबविण्याचा विचार करता येईल, असे रशियाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र युक्रेनने त्याला अद्याप होकार दिलेला नाही. बायडेन युरोप दौऱ्यात पोलंडलाही भेट देणार आहेत. युरोपीय समुदायाच्या २७ सदस्य देशांच्या प्रतिनिधींबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची एक बैठक होणार आहे. रशियाला चहूबाजूंनी कोंडीत पकडण्यासाठीच या सर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
रशियाच्या बँकेवर अमेरिकेचे निर्बंध
रशियाच्या सेंट्रल बँकेने आर्थिक व्यवहार करताना सोन्याचा वापर करण्यावर जी-७ गटातील देशांनी निर्बंध लादले आहेत. रशियाच्या लोकप्रतिनिधीगृहातील ३२८ सदस्य, त्या देशातील श्रीमंत व्यक्ती व सरकारी मालकीच्या ४८ संरक्षण उत्पादन कंपन्यांवर अमेरिकेने याआधीच निर्बंध लागू केले होते.
बायडेन यांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी
रशियाविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अमेरिकेच्या जनतेने व्यक्त केली आहे. यासंदर्भातील एका जनमत चाचणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी केलेली आवाहने रशियाने धुडकावून लावली होती. त्यानंतर या देशांनी रशियावर काही निर्बंध लादूनही पुतिन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.