कीव: युक्रेनवर हल्ला करणारे रशियन सैनिक अतिशय घाबरले आहेत. दोन दिवसांत युक्रेन ताब्यात घेऊ, असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होता. मात्र युक्रेनी सैन्य जीवावर उदार होऊन मोठ्या धैर्यानं रशियन सैन्याशी दोन हात करत आहे. त्यामुळे आता रशियन सैन्याच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाला आहे. रसद पुरवठा होत नसल्यानं रशियन सैनिक त्रासले आहेत. त्यांच्या रेडिओ संभाषणातून याबद्दलचा उलगडा झाला आहे.
युक्रेनवर हल्ला करण्यासाठी गेलेले रशियन सैनिक गोंधळले असल्याचं दिसत आहे. ब्रिटिश गुप्तचर कंपनीच्या हाती लागलेल्या व्हॉईज रेकॉर्डिंगमधून ही बाब समोर आली आहे. डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, एका व्हिडीओमध्ये हताश झालेले सैनिक रशियाच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. यावेळी मी आत्महत्या करू इच्छितो, असं एका सैनिकानं त्याच्या आईला व्हिडीओ कॉल करून सांगितलं.
रशियाचे सैनिक आता युद्ध लढू इच्छित नाहीत. त्यामुळे ते स्वत:च आपल्या वाहनांमधील इंधन टाक्यांना छिद्र पाडत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर एका रशियन सैनिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा सैनिक त्याच्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत आहे. सैनिक अतिशय भावुक झाला आहे.
मी आता युक्रेनमध्ये आहे आणि युक्रेनी सैन्यानं मला पकडलं आहे, असं रशियन सैनिक त्याच्या आईला सांगत आहे. 'मी ठीक आहे. आमचा विश्वासघात करण्यात आला. आम्ही शांतीरक्षक असल्याचं आम्हाला वाटलं. पण तसं नाहीए. आमची फसवणूक करण्यात आली आहे,' असं हा सैनिक साश्रूनयनांनी आपल्या आईला सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.